वपुर्झा !



व. पु. काळे लिखित हे सुंदर पुस्तकं आहे. सुवचने आकाराने लहान  पण आशयाने व बोधाने महान असतात.
   मुखपृष्ठ हे विशेष आकर्षित तर आहे पण त्या मागचा अर्थ सांगताना व. पु काळे लिहितात "मुखपृष्ठावरील हा पेला रिकामा आहे. आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळमट, जळजळ, स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या, म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेल्यात आकाश उतरत. अशाच अनेक कलावंतांच्या, अनेक अविष्कारांसाठी तुम्ही तुमचा मनाचे गाभारे रिकामे,  स्वच्छ ठेवलेत. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशने नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी, कायम रिताच राहावा. असा मला आशीर्वाद द्या !"  अशा सुंदर शब्दात त्यांनी वर्णन करून त्या मागचा गहन अर्थ सांगितला आहे.
      यशवंतराव यांच्यासोबतच एक किस्सा सांगून लेखकांनी पुस्तकाची सुरवात केली आहे. त्या नंतर ते लिहितात कि आत्मचरित्र मी कधीही लिहिणार नाही कारण लिहिण्यासारखे खूप नाट्यमय प्रसंग आहेत म्हणून ते नकोच असे त्यांना वाटते.
       खर सांगायचं तर पुस्तकाचे पहिलं पान वाचायला सुरवात केली की थोडा कंटाळवाण वाटतं पण हळू हळू जसा जसा शब्दांचा अर्थ उलगडत जातो तसा तसा माणूस ह्या पुस्तकात गुंतत जातो.
        हे पुस्तक नक्की काय आहे कुठलाही परिच्छेद एक मेकांशी संलग्न नाही त्या मागची कल्पना काय हे हीं आपल्याला पुस्तकाचे पाठ्यपुष्ट बघितल्यावर लगेच समजते त्यात ते लिहितात
     वपुर्झा -
             कोणतंही पान उघडा आणि वाचा!!
'वपुर्झा 'हे पुस्तकं कुणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी !!
हे पुस्तकं कस वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात ?छे !!मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तरांच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तस अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तस अत्तर निवडायचं. हे पुस्तकं असच वाचायचं. हव ते पान आपापल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधाने भारून जायचं.
एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटलं तर ?पुन्हा शोधायचा. त्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणून या पुस्तकात अनुक्रमाणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेल नाही......

   
         असेच अनेक अलंकारिक शब्दांनी भरलेला पुस्तकं कधी आपल्याला आपल्या जीवनाशी निगडित वाटायला लागत कळतही नाही. प्रत्येक उदाहरण हे आपल्या सोबत घडलेली घटना आहे असे वाटायला लागते कारण जीवनात अनुभवल्या गोष्टी यात दिसतात ते हीं अगदी छोट्या सुवचनातून.
       पालक या शब्दाची व्याख्या सांगताना लेखक सांगतात "स्पर्श न करताही आधार देता येतो हे ज्याला कळत त्याला पालक शब्द समजला !"
      आपल्या सोबत घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी या पुस्तकात वाचताना हे पुस्तकं त्याच्याकडे आपल्याला आकर्षित करते यात शंका नाही जसे की "रातकिडा कर्कश ओरडतो, त्या ओरडण्याचा त्रास होतो ह्यात शंका नाही, पण त्यापेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतोय हे शोधण्यात होतो."
      "कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा इतर कंटाळतात तेव्हा त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांचा लक्षातही येत नाही. माणसांच स्वतःच्याच कंटाळ्यावर प्रेम असत !"
      "सुविचारांची वही ही नंतर शोभेची वस्तू होते !"
    "ज्याला प्रेम समजत, शब्द समजतो तो वेळ पाळतो, आणि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो. "
       "स्वतःच्या मालकीचे चोरले न जाणारे खूप क्षण असतात. दुसऱ्याकडे एखादा क्षण मागितला की आपण भिकारी झालो अस समजायचं !"
      आजकालच्या परिस्थितीशी जुळणार उधाहरण म्हणजे "शत्रुत्व म्हणजे काय  "-
"शत्रुत्व पैदा होण्यासाठी आधी परिचय हवा. त्याच मैत्रीत रूपांतर व्हायला हव. मग केव्हा तरी किरकोळ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, म्हणून मतभेद किंवा 'अतिपरिचयात अवज्ञा!' अशे शत्रुत्वाचे ही टप्पे असतात !!!!
     संशयाने एकदा समजूतदार पणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोप करीत नाही !!
      प्रत्येक प्रॉब्लेम ला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टींचा पलीकडे प्रॉब्लेम नसतो.
    कष्ट न करता सुधारक बनवणाऱ्या गोष्टी झटपट सर्वत्र होतात.
Last but not the least "नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात. म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरता चिरंजीव होत. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
      "साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असत त्यात आपल्या विचारांचा कात टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ रंगत नाही. आणि लेखकाला हवा असतो संवाद त्याशिवाय त्याच पान रंगत नाही "
      सगळ्यांना आवडेल व नक्कीच काहीतरी नवीन शिकवेल असं हे पुस्तकं प्रत्येकाने एकदा तरी वाचावे !!!!!🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आमचा बाप आन् आम्ही

स्वतःचा शोधात निघताना!